उद्धव ठाकरे त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते लपवू शकले नाहीत.

सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (07:36 IST)
अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोनही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यासोबत शिवसेना हे नावदेखील वापरता येणार नसल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे गटासाठी हा धक्का होताच. पण स्थापनेपासून शिवसेना जवळून पाहणाऱ्या उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला. पक्षाचे चिन्ह आणि नाव निवडणुकीसाठी वापरता येणार नसल्याचे समजताच उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल रवी म्हात्रे यांना अक्षरश: भावना अन् अश्रू अनावर झाल्याचा एक हळवा किस्सा भास्कर जाधवांनी आज साऱ्यांना सांगितला. हा किस्सा ऐकून संपूर्ण सभागृहदेखील सुन्न पडल्यासारखे झाल्याचे दिसून आले.
 
आजपासून शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात ठाण्यामधून झाली. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज भास्कर जाधव यांनी भाषण केले. भास्कर जाधव यांना विधानसभेत अतिशय आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना साऱ्यांनीच पाहिले आहे. पण आजच्या भाषणात त्यांनी आक्रमक आवाज असूनही शिवसैनिकांना भावनिक साद घातली आणि उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा एक किस्सा सांगून सभागृहातील साऱ्यांनाच स्तब्ध करून टाकले.
 
उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना नेते उपनेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलावली होती. या बैठकीअगोदर मातोश्रीवर घडलेला भावनिक प्रसंग भास्कर जाधवांनी सांगितला. "इतक्या वर्षात उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक संकटे आली पण ते कधी डगमगले नाही. आज त्यांच्यावर सगळ्या बाजूंनी हल्ले होत आहेत, काही कुटुंबीयदेखील विरोधात उभे आहेत, बंडखोर त्रास देत आहेत... पण तरीही ते सारं काही सहन करून सामोरे जात आहेत. असं असले तरी मला काही पत्रकारांनी सांगितलं की आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं. पत्रकारांच्या नंतर आम्ही सारे नेतेमंडळी त्यांना भेटलो, त्यावेळीही मला त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले. ते दाखवत होते की मला काहीही झालं नाही, मी ठीक आहे, पण त्यांच्या डोळ्यातलं पाणी ते लपवू शकले नाहीत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती