कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यापासून ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात असताना ही परीक्षाही पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता १ नोव्हेंबरची अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि २२ नोव्हेंबरची दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षाही एमपीएससीने पुढे ढकलली. तब्बल ४ लाख ४० हजार विद्यार्थी या दोन्ही परीक्षा देणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहचली असताना एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी तणावात आहेत.