लॉकडाऊन विरोधात व्यापारीही न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत

शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (08:18 IST)
राज्यभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने १५ दिवसांचा जाहीर केला आहे. राज्य शासनाने यापुर्वी १५ दिवस आणि आता पुन्हा १५ दिवस म्हणजे  महिनाभर व्यापार बंद ठेवण्यास भाग पाडून छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांच्या पोटावर पाय दिला आहे. व्यापाऱ्यांना आर्थिक संकटात टाकण्याचा आरोप करीत शासनाच्या या निर्णयाबाबत आता दोन दिवसात कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
 
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, राज्यातील छोटे – छोटे व्यापारी अडचणीत आहे. त्यांचा व्यापार सुरू राहणे आवश्यक असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांची भूमिका मांडण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री व सरकारला निवेदन देऊनही व्यापाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येत आहे. ज्यांच्यावर कारवाई होईल त्यांनी महाराष्ट्र चेंबरकडे माहिती द्यावी त्याविरोधात लढा देण्यात येईल, असेही मंडलेचा यांनी यावेळी सांगितले.
 
दरम्यान, राज्य सरकारने संचारबंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. एकीकडे लोकांनी बाहेर येऊ नये म्हणतात तर दुसरीकडे रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू राहणार असल्याचेही जाहीर करतात. सगळं सुरू आहे? मग व्यापारच बंद का आहे? सरकारच्या आदेशात गोंधळच आहे. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती