काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस सदस्यांनी तीन नावांवर एकमत केले आहे. विरोधीपक्ष नेता निवडीचा अधिकार पूर्णपणे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिला असून, असा ठराव आमदारांनी मंजूर केला आहे. सर्व आमदारांकडून अनुमोदन दिले असून, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व आमदारांची भेट घेतली आहे.
काँग्रेस विधीमंडळ बैठकीत तीन नावांची चर्चा झाली आहे, यामध्ये बाळासाहेब थोरात, विजय वड्डेटीवार, वर्षा गायकवाड या नावांची चर्चा झाली. मात्र गटनेता निवड अंतिम निर्णय दिल्लीत हायकमांड घेण्याचा निर्णय करण्यात आला आहे. यासाठी सर्व आमदारांनी पाठिंबा दिला असून, विखेंचे कट्टर प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळणार असे चित्र आहे. नगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे एका पक्षात असले तरी त्यांचा एकमेकांना जोरदार विरोध आहे. मात्र विखे पाटलांनी आता भाजपशी जवळीक केली आणि पुत्र प्रेमासाठी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये सभा घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थोरातांच्या निवासस्थानी मुक्कामही केला होता. शिवाय एकत्र प्रवास केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्यावर विधानसभेपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची जोरदार चर्चा आहे.