परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरं अजामीनपात्र वॉरंट जारी

बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (21:10 IST)
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्याविरोधात बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) परमबीर सिंह यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली होती. दरम्यान, परमबीर सिंह यांच्याविरोधात तिसरं अजामीनपात्र वॉरंट जारी झालं आहे.
 
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसुल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची स्थापना केली आहे. या प्रकरणी आयोगाने परमबीर सिंग यांना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी आणि साक्ष घेण्यासाठी अनेकवेळा समन्स पाठवलं होतं. मात्र तरीही ते आयोगासमोर हजर झाले नाहीत.
 
यापूर्वी सोमवारी सीआयडीने या प्रकरणी निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके या दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली होती. हे दोन्ही पोलीस अधिकारी यापूर्वी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत तैनात होते. नंदकुमार गोपाले हे सध्या खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर आशा कारके हे नायगाव स्थानिक शस्त्रास्त्र युनिटमध्ये तैनात होते.
 
रिअल इस्टेट व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अग्रवाल यांनी या वर्षी २२ जुलै रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह आणि इतर पोलीस अधिकार्‍यांविरोधात खंडणी मागितल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली होती. तथापि, कोर्टात हजर केल्यानंतर दोघांनाही सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती