मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा या आठवड्यात संपुष्टात येऊ शकते, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रालय मिळू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. गृहमंत्रीपदाचाच तिढा होता आणि तो आता सुटल्याचे समजते.
रविवारीच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मंत्रिमंडळाचा विस्तार इतक्या लवकर होऊ शकतो, ज्याची तुम्ही लोकांनी कल्पनाही केली नसेल. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात १५ ऑगस्टपर्यंत मंत्रिपरिषद स्थापन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या कोट्यातून चंद्रकांत पाटील, आशिष शेलार या ज्येष्ठ नेत्यांना स्थान मिळण्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवासांपासून दिल्लीत होते. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेही सहभागी झाले होते. या बैठकीला देशभरातून एकूण २३ मुख्यमंत्री आले होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिंदे आणि फडणवीस यांनी भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीका होत आहे. तसेच, जिल्ह्यांना पालकमंत्री नसल्याने अनेक कामे खोळंबल्याचे सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार येत्या एक-दोन दिवसातच करण्याचे निश्चित झाले आहे. गृहमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाकडूनही होत होती. मात्र, मुख्यमंत्रीपद शिंदे यांना दिल्याने भाजपने गृहमंत्रीपद स्वतःकडे घेण्याची भूमिका ठेवली होती. आता हा तिढा सुचल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यपाल सुद्धा महाराष्ट्रात परतले आहेत. येत्या १२ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेतील वादाची सुनावणी होत आहे. त्यापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहेत.