विजेचा धक्का बसून दोघा भावांचा दुर्दैवी मृत्यू

शनिवार, 20 नोव्हेंबर 2021 (15:18 IST)
अहमदनगर  शेतातील पिकांची रानडुक्करं नुकसान करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडला. मात्र या शेतकऱ्याचा शेजारी रात्रीच्या वेळी ज्वारीला पाणी देण्यासाठी गेला असता वीज प्रवाह सोडलेल्या कुंपणाला हात लागल्याने विजेचा धक्का बसून दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यातील नाळवंडी येथे घडली. हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख असे मृत्यू झालेल्या शेतकरी भावांची नावे आहेत.
 
याबाबत अधिक माहिती अशी सध्या शेतकऱ्यांना रान डुकरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा प्रशासन दरबारी शेतकऱ्यांनी सांगूनही प्रशासन व्यवस्था याकडे दुर्लक्ष करते म्हणून शेतकरी रानडुकरांच्या बंदोबस्तासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पाटोदा तालुक्यातील नाळवंडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकांचा रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी तारेचे कुंपण करुन त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला होता.रात्री त्यांच्या शेजारचे शेतकरी हुसेन फकीरभाई शेख व जाफर फकीरभाई शेख हे रात्रीची वीज असल्याने गुरुवारी रात्री शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते.यावेळी हुसेन फकीरभाई शेख यांचा कुंपणाच्या विद्यूत प्रवाह सोडलेल्या त्या तारेला हात लागला. त्याचवेळी त्यांचे बंधू जाफर फकीरभाई शेख हे त्यांना सोडवण्यासाठी त्याठिकाणी गेले, मात्र त्यांनाही विजेचा शॉक लागला. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती