नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करणार

शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021 (21:52 IST)
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्य सरकारने ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
 
या बैठकीनंतर राज्यातील नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सुरु करण्याचे आदेश संबंधित शासकीय अधिकारी आणि विभागांना तात्काळ देण्यात आले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा मनोरंजन क्षेत्राला बसला आहे. यामुळे कलाकारांबरोबरच या क्षेत्रातील इतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रण येत असल्याने राज्य सरकारने नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेबरोबरच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी केली होती. पण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला होता. पण अखेर राज्य सरकारने नाट्यगृह काही अटी व शर्थींवर ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिल्याने कलाकार व मनोरंजन क्षेत्राबरोबर संबंधित कर्मचारांनी आनंद व्यक्त केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती