कोणीतरी महान व्यक्ती सांगून गेला आहे.‘ऑनलाईन मित्राचा नाद नको रे भावा’ पण अशाच ऑनलाईन मित्राचा नाद एका तरुणाला चांगलाच महागात पडला. डोंबिवलीत एका तरुणाला त्याच्या ऑनलाईन मित्राने जाळ्यात अडकवलं आणि मग काय थेट त्याची दुचाकी घेऊन फरार झाला. सोशल मीडियाच्या आधारे दुचाकी चोरीची शक्कल या चोरानं लढवली. मात्र ‘कानून के हात लंबे’ असतात म्हणून तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.
आपण आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीनंतर केलेल्या फसवणुकीचे प्रकार ऐकतो. मात्र एका पठ्ठ्याने त्याच्या माध्यमातून दुचाकी चोरीची अजब शक्कल लढवली आणि सोशल मीडियावरील हिच मैत्री एकाच्या मात्र महागात पडली. ही घटना एक घटना डोंबिवलीतील आहे. इंस्टाग्रामवर ओळख वाढवत भेटण्यास बोलवून राईडच्या बहाण्याने महागडी बाईक चोरून ‘ऑनलाईन मित्र’ पसार झाला. याची तक्रार संबंधित तरुणाने पोलिस ठाण्यात दिली असता डोंबिवली पोलिसांनी या संशयित ऑनलाईन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहे. तर हा चोरटा सराईत बाईक चोर असल्याची धक्कादायक बाब पोलिस तपासात समोर आली आहे.
या संशयितविरोधात डोंबिवली, मानपाडा, ठाण्यातील कोपरी, कापूरबावडी पोलीस ठाण्यात बाईक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच त्याने आणखी काही दुचाकीने चोरी केल्याचा संशय पोलिसांना असून पोलीस त्या दृष्टीने पुढील तपास पोलीस करत आहेत. याआधी हा चोरटा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्या चोरायचा. यावेळी मात्र त्याने ही नवीन शक्कल लढवली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
संशयित चोरट्याने डोंबिवली पश्चिममध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत इंस्टाग्रामद्वारे ओळख केली. त्याचा विश्वास जिंकत त्याला भेटण्यासाठी बोलावले आणि राईडच्या बहाण्याने मागितली आणि दुचाकी घेऊन तिथून निघून गेला. बराच कालावधी उलटून चोरटा परत न आल्याने या तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीची ओळख पटली. हा संशयित आरोपी हा कल्याण पश्चिम भागात फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान संशयित सराईत चोरटा असल्याचे समोर आले. त्याच्या विरोधात डोंबिवली, मानपाडा कोपरी, कापूरबावडी या पोलिस ठाण्यात एकूण चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र घटनेतून मिळत असलेले तात्पर्य एकच की आपणही सोशल मीडियावरील ओळखीच्या आधारे विश्वास जरा जपूनच ठेवायचा.