नाशिक : अनेक दिवसांपासून राज्यातला शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. कांद्याचा भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा लाल वादळ अर्थात लॉन्ग मार्च काढला निघाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लॉन्ग मार्च काढला आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून लॉन्ग मार्च निघाला. रविवारी सायंकाळी उशिरा नाशिक येथील म्हसरूळ परिसरात मुक्कामी आलेला लॉंग मार्च सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास नाशिक शहरातील म्हसरूळ कडून शहरातील दिंडोरी रोड, मुख्य बाजार समिती, दिंडोरी नाका, काट्या मारूती चौक, संतोष टी पॉइंट मार्गे मुंबई नाक्याच्या दिशेने पुढे निघत मुंबईच्या दिशेने निघाला आहे. येत्या २३ मार्च रोजी हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे. दरम्यान बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणू, असे आश्वासन दिले. मात्र, मोर्चेकरी आपल्या निर्णयावर ठाम असून मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
शेतकरी, कष्टकरी आदिवासी बांधव यांनी विविध मागण्यांसाठी दिंडोरी येथून पायी लाँग मार्च काढला आहे. जोपतर्यंत मागण्यांसंदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे बैठकीनंतर माजी आमदार जेपी गावित म्हणाले, मागचा अनुभव कटू आहे. २०१८ च्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे हा लाँगमार्च थांबणार नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लोक चालत राहतील. प्रमुख मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे लोक परत येतील का? लोकांचा आमच्यावर विश्वास राहिल का? पायी येणे लोकांना परवडते, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे, म्हणून ते आमच्यासोबत आहेत.
बैठक निष्फळ ठरली
पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चा करून प्रश्न सोडवू, असे सांगून बैठकीचे आयोजन केले होते. दोन दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सर्व विभागाचे मंत्री आणि सचिव यांना बोलावण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. पण ही बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी आंदोलकांची भेट घेत संवाद साधला आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधला असून उद्या दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. मात्र तरी देखील हे आंदोलक शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून विधानभवनाला घेराव घालण्यासाठी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत असून सोमवारी रात्री ईगतपुरी जवळ असलेल्या वाडीवऱ्हे येथे मुक्कामी आहेत.
भाजीपाला ओतून सरकारचा निषेध
मुंबईकडे निघालेल्या या लाँग मार्च मधील सहभागी आंदोलक शेतकऱ्यांनी नाशिक शहरातील निमाणी चौकात पोहोचल्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, वांगे रस्त्यावर ओतून आपला संताप व्यक्त करत सरकारचा निषेध नोंदवला आहे.