वीजग्राहकांना सार्वजनिक सुटीच्या दिवशी थकबाकी व वीजबिलांचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणचे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र फेब्रुवारी महिन्यातील सर्व सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत. या संदर्भात प्रादेशिक कार्यालयातून सर्व कार्यालयांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती, महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात नमुद केले आहे की, महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्याने थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे. सोबतच नोटीसेस पाठवून व प्रत्यक्ष संपर्क साधून वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील वीजग्राहकांच्या सोयीसाठी फेब्रुवारी महिन्यातील सर्व शनिवार व रविवारसह इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी देखील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.
याशिवाय घरबसल्या थकबाकी व वीजबिलांचा भरणा करण्यासाठी ऑनलाईन सोय उपलब्ध आहे. लघुदाब वीजग्राहकांना ऑनलाईन बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.
महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईनचे क्रेडीट कार्ड वगळता उर्वरित सर्व पर्याय निःशुल्क झाले आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी याआधी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु फक्त क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीटकार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाईनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क आहे. ऑनलाईन बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे