रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे ठाकरे गटाचे नेते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या तयारीसाठी खा. संजय राऊत हे नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी काल मालेगावला जाण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, निवडणूक आयोगाचे वागणे चुकीचे असून, सत्ताधारी पक्ष हाताशी धरून त्यांच्या सोयीचे काम करीत आहे.
त्यामुळेच त्यांनी शिवसेना विरोधात भूमिका घेतली तसेच इतर पक्षांनाही अडचणीत आणण्याचे काम निवडणूक आयोगाकडून केले जात आहे, असा आरोप करून राऊत पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या दबावाखाली ईडी आणि सीबीआय हे काम करीत आहे. फक्त विरोधकांना टार्गेट केले जाते, असाही आरोप त्यांनी केला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे एक प्रकारची स्क्रिप्ट होती आणि ती त्यांनी वाचून दाखवली असा टोला देऊन राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही बरोबर येऊन विधिमंडळात गेले याकडे उगाच अफवा पसरवण्यात येत असून त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन हा अतिशय चुकीचा आहे.
संभाजीनगरच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये नावामध्ये बदल होता कामा नये. कारण पूर्वीपासून म्हणजे शिवसेनाप्रमुखांची ही जुनी मागणी होती त्याच्या समर्थनात नागरिक एकत्र येतीलच असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की सध्या राज्यामध्ये आणि देशांमध्ये जातीय दंगली घडवून आपली पोळी भाजण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून होत आहे.