विद्यार्थ्यांना मोठा दिलासा : अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे ट्वीट

गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (21:24 IST)
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी नव्या अभ्यासक्रमाबाबत आंदोलन छेडले होते. नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली असून सुधारित परीक्षा पद्धत अन् अभ्यासक्रम २०२५ पासूनच लागू होणार असल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. यामुळे यंदा एमपीएससीला बसलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  घेण्यात येत असणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार वर्णात्मक पद्धतीने घेण्यात येणार होती. सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्यात येणार होता. परंतु, नव्या शैक्षणिक धोरणाचा दाखला देत तो २०२३ पासूनच लागू करण्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवले. याविरोधात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी राज्यभर आंदोलन छेडले. 
 
डिसेंबर महिन्यात झालेल्या आंदोलनाची दखल सरकारने घेतली. त्यामुळे सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन सुधारित परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत सरकारकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्रही पाठवण्यात आले. मात्र, या पत्राबाबत लोकसेवा आयोगाने कोणताही निर्णय पारीत केला नाही. परिणामी मुख्य परिक्षा तोंडावर आलेल्या असताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन छेडले. नवा अभ्यास आणि नवी परीक्षा पद्धत २०२५ पासूनच लागू करण्याच्या मागणीला त्यांनी जोर दिला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एमपीएससीला पत्र लिहून विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याची विनंती केली.
 
दरम्यान, हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता त्याला राजकीय पाठिंबाही मिळू लागला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परवा रात्री आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. तसंच, ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विद्यार्थ्यांच्या भेटीला जाणार होते. परंतु, त्यांच्या भेटीआधीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय जाहीर करून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार, २०२५ पर्यंत जुन्या पद्धती आणि अभ्यासक्रमानुसारच परीक्षा होणार आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती