नगरपालिका निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ नगरपालिकांच्या ३२४ जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले होते. गुरुवारी लागलेल्या या निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत चिन्हावर सर्वाधिक ९३ जागांवर विजय संपादन केला आहेत. तसेच शिरुर येथील राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीने १२ जागा जिंकल्या असून दुसऱ्या टप्प्यातील निकालात शंभरहून अधिक जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पुढे ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर लातूर जिल्ह्यातील औसा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती या दोन ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. तसेच शिरुर येथे आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष विजयी झालेला आहे. यापैकी बारामती नगरपालिकेच्या ३९ जागांपैकी ३५ जागा जिंकत एकहाती विजय मिळविला आहे. तर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पोर्णिमा तावरे या विजयी झाल्या आहेत. तसेच लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेत २० पैकी १२ जागांवर पक्षाने विजय संपादित केला असून इथे अफसर शेख हे नगराध्यक्ष पदी विजयी झालेले आहेत. शिरुर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिरुर विकास आघाडीने २१ पैकी १२ जागांवर विजय मिळवला आहे. इथे वैशाली जाधव नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.