पंढरपूरात 39 कोटी 43 लक्ष रू. खर्चुन संकीर्तन सभागृह उभारण्‍यात येणार

गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:33 IST)
वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्‍यासाठी डिसेंबर 2016 च्‍या हिवाळी अधिवेशनात 10 कोटी रूपये निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे. 39 कोटी 43 लक्ष रू. निधी खर्चुन बांधण्‍यात येणा-या सदर संकीर्तन सभागृहासाठी 10 कोटी रू. निधी पहिल्‍या टप्‍प्‍यात मंजूर करण्‍यात आला आहे.
 
पंढरपूर नगर परिषदेच्‍या मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 53 येथे सदर संकीर्तन सभागृह उभारण्‍यात येणार आहे. दिनांक 1 जुन 2016 रोजी पंढरपूर येथे आयोजित नमामि चंद्रभागा परिषदेत नमामि चंद्रभागा अभियान यशस्‍वीरित्‍या राबविण्‍याच्‍या दृष्‍टीने नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्‍थापन करण्‍याची तसेच पंढरपूर येथे संकीर्तन सभागृह उभारण्‍याची घोषणा वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. या घोषणेनुसार राज्‍य शासनाने नमामि चंद्रभागा प्राधिकरण स्‍थापन केले आहे. त्‍याचप्रमाणे डिसेंबर 2016 च्‍या हिवाळी अधिवेशनात 10 कोटी रू. निधीची तरतूद करून संकीर्तन सभागृह उभारण्‍याच्‍या घोषणेची पूर्तता सुध्‍दा वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
 
महाराष्‍ट्राचे आराध्‍य दैवत पंढरपूरच्‍या श्री विठ्ठलाच्‍या चरणावर लीन होत लाखो वारक-यांच्‍या मनात सामाजिक समतेचा अध्‍यात्मिक वारसा प्रवाहित करणारी चंद्रभागा महाराष्‍ट्राच्‍या निखळ,निरागस श्रध्‍देचा मानबिंदू आहे. वारकरी आणि चंद्रभागा यांचे अतुट नाते आहे. चंद्रभागेच्‍या पावित्र्याचे आणि निर्मळतेचे अनन्‍यसाधारण महत्‍व लक्षात घेऊन नमामि चंद्रभागा अभियान शासन व लोकसहभागातून राबविण्‍याचा संकल्‍प वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन 2016-17 चा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करताना जाहीर केला होता. या अभियानाअंतर्गत चंद्रभागा नदी सन 2022 पर्यंत निर्मळ, पवित्र व प्रदुषणमुक्‍त करून तिचे संवर्धन करण्‍यासाठी 20 कोटी रूपये निधीची तरतूद त्‍यांनी अर्थसंकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन केली आहे. या अभियानात व्‍यापक लोकसहभाग मिळावा व सर्वांच्‍या प्रयत्‍नातुन हे कार्य यशस्‍वीरित्‍या पूर्णत्‍वाला जावे या उददेशाने वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने या अभियानासंदर्भात संकेत स्‍थळ तयार करण्‍यात आले असुन या संकेत स्‍थळाचे उदघाटन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले आहे.
 
श्री क्षेत्र पंढरपूर तसेच वारकरी संप्रदाय व चंद्रभागा यांचे नाते व महाराष्‍ट्राला लाभलेली थोर संत परंपरा या पार्श्‍वभूमीवर पंढरपूरात उभारण्‍यात येणारे संकीर्तन सभागृह या अभियानातील महत्‍वपूर्ण टप्‍पा आहे. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमामि चंद्रभागा हे अभियान यशस्‍वीरित्‍या पूर्ण करण्‍याच्‍या प्रक्रियेमध्‍ये संकीर्तन सभागृहाच्‍या माध्‍यमातुन मोलाची भर घातली आहे.

वेबदुनिया वर वाचा