एसटीचे नियोजन पूर्ण, गावी जाता येणार

रविवार, 10 मे 2020 (10:04 IST)
राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक मजूर, विद्यार्थी आणि इतर लोक अडकून पडले आहेत. त्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या सर्वांना गावी जाण्यासाठी २२ जणांची यादी करावी लागणार आहे. ही यादी शहरातील लोकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावातील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. त्यात त्यांचा मोबाईल नंबर, आधारकार्ड नंबर, जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायचे ते याची सर्व माहिती नोंदवावी लागणार आहे. त्यानंतर २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण आणि वेळ सांगतिल. तसेच प्रत्येकांनी आपल्या खाण्यापिण्याची स्वत:च व्यवस्था करावी. मात्र, गावी जाण्यासाठी कोणतेही भाडे आकारले जाणार नाही, असेही परब यांनी सांगितले आहे. राज्यातील कोणत्याही रेड झोन कंटेन्मेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
 
एका एसटीतून केवळ २२ प्रवाशांना जाता येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक सीटवर एका व्यक्तीला बसण्याची सोय केली जाणार आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्ती तोंडाला मास्क लावणार अशांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मोफत जाण्यास मिळत आहे म्हणून कोणीही पोलीस ठाण्यात किंवा तहसील कार्यालयात विनाकारण गर्दी करु नये. त्याचप्रमाणे गावाकडे पोहोचल्यानंतर या प्रवाशांची तपासणी करायची की नाही याचा निर्णय संबंधित नोडल अधिकारीच घेतील, असेही त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती