पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाला आहे. यावेळी अविश्वास प्रस्तावादरम्यान मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून, सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याचा व्हीप आपल्या खासदारांना बजावला आहे. त्यामुळे अविश्वास प्रस्तावापूर्वीच मोदी सरकारचे पारडे जड झाले आहे.
केंद्र आणि राज्यात सत्तेत असूनही गेल्या काही काळापासून सातत्याने भाजपाविरोधात भूमिका घेणारी शिवसेना अविश्वास प्रस्तावाबाबत काय निर्णय घेते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. शिवसेना या अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने मतदान करेल किंवा या प्रस्तावावर बहिष्कार टाकेल अशीही शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिवसेना नेतृत्वाने अविश्वास प्रस्तावाबाबत भूमिका स्पष्ट करताना केंद्र सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यासंदर्भातील व्हीप सेनेच्या लोकसभेतील खासदारांना बजावण्यात आला आहे.