शिवसेनेचा मुंबईत भाजपाला जोरदार झटका, माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिवसेनेत प्रवेश

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (07:47 IST)
भाजप नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हेगडे यांनी शिवबंधन बांधले आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आपण शिवसैनिक म्हणून काम करणार असल्याचे हेगडे यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील काही काळापासून ते भाजपमध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. 
 
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर, कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून रेणू शर्मावर कारवाईची देखील मागणी केली होती. एवढेच नाही तर रेणू शर्मा यांनी आपल्यालाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले होते.
 
कृष्णा हेगडे हे मूळचे काँग्रेसचे आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता ते शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी आमदार असलेल्या कृष्णा हेगडे यांनी, काँग्रेसच्या तिकिटावर विलेपार्ल्यातून विधानसभेची निवडणूकही जिंकली होती. चार वर्षांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती