हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज आठवा स्मृतीदिन

मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (08:44 IST)
बाळासाहेब आज आपल्यात नसले तरीही त्यांची वादळी राजकीय कारकिर्द आणि राजकारणातील त्यांचं योगदान हे कायमच अग्रस्थानी राहील. अशा या नेत्याच्या काही स्मृतींना शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून उजाळा देण्यात आला आहे. 
 
'बाळासाहेबांना साष्टांग, साष्टांग नमस्कार', असं म्हणत 'शूरातला शूर, सुंदरातला सुंदर, अदभूत प्रेमकथेच्या नायकासारखा बाजीराव मनाला चटका लावून गेला', हा संदर्भ देत बाळासाहेबांचं वर्णन करण्यात आलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा प्रभाव असणाऱ्या बाळासाहेबांच्या कारकिर्दीतील काही महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रकाझोत टाकण्यात आला. 
 
शिवसेनेच्या स्थापनेनं बेरोजगार मराठी तरुणांचे प्रश्न बाळासाहेबांनी मांडले आणि यातूनच पुढं त्यांच्या हक्कांसाठीच्या लढ्याचा वणवा पेटला. मुंबई- महाराष्ट्रातील रोजगारावर पहिला हक्क हा भूमिपुत्रांचा, ही ठिणगी खुद्द बाळासाहेबांनीच अनेक वर्षांपूर्वी टाकली होती हा मुद्दा अग्रलेखातून अधोरेखित करण्यात आला. 
 
देशात प्रादेशिक पक्षांच्या सुरु असणाऱ्या राजकारणाची सुरुवातच मुळात शिवसेनाप्रमुखांकडून झाली होती याचं स्मरण करुन देत बाबरी प्रकरण पेटत गेलं तेव्हा अनेकांनीच यातून आपलं अंग काढून घेतलं. पण, त्याचवेळी खुद्द बाळासाहेब ठाकरे गर्जना करत पुढे आले आणि बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असल्याच त्याचा मला अभिमान आहे, अशी गर्जनाच केल्याचं म्हणत तो काळ अग्रलेखातून पुन्हा उभा करण्यात आला. 
 
मराठी माणूस, महाराष्ट्र आणि हिंदुत्त्वाचा विजय बाळासाहेबांमुळंच झाला असं म्हणत त्यांना अग्रलेखातून वीरपुरुषाची उपमा देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती