Mumbai News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. शरद पवार यांच्या पक्षाने 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आता पक्षात बदलाचे वारे सुरू होण्याची चिन्हे आहे. आता पक्षातील महत्त्वाच्या पदांवर कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्याबाबत यापूर्वी राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू होत्या.
8 जानेवारीला सर्व सेल, आमदार, खासदार आणि विभागप्रमुखांची बैठक होणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांनाही 9 जानेवारीच्या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे. या दोन दिवसीय बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार आहे. या बैठकीला शरद पवार स्वत: उपस्थित राहणार असून काही मोठा निर्णय घेऊ शकतात.