शरद पवार यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

मंगळवार, 29 जून 2021 (22:30 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (29 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली.
 
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते.
 
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
 
मंगळवारी (29 जून) मनी लाँडरिंग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं आहे.
 
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी (28 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच शरद पवार यांची ' सिल्व्हर ओक' या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
 
मुंबई शहरात कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची सोय करण्यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाला 100 सदनिका हस्तांतरित करण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली होती. अर्थात, त्यानंतर पर्यायी जागा देत यावर तोडगाही काढण्यात आला.
या सर्व भेटीगाठी आणि घडामोडींमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची आपली बैठक ही बीडीडी चाळीसंदर्भात होती, असं सांगितलं आहे.
 
या भेटीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर होता. प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम होता. म्हाडाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती यामुळे नाराजी होती. त्यासोबत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने आघाडीत संभ्रमाचं वातावरण होतं. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी संजय राऊत मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भेटले. आजही महाविकास आघाडीच्या विविध मुद्यांवर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली असावी.
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती