संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शरद पवार यांचा नागरी सत्कार

शनिवार, 29 जुलै 2017 (16:45 IST)

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आज अहमदनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार  यांच्या संसदीय कारकीर्दीची ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग अभंग यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे , आमदार जयंत पाटील  , उपस्थित होते.

या सोहळ्यात बोलताना माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार हे एकमेव नेते आहेत ज्यांनी ५० वर्षात एकही निवडणूक न हरता समाजाचं नेतृत्त्व केलं आणि जनतेची सेवा केली आहे, असे म्हटले. तसेच, समाजातील प्रत्येक घटक पवार साहेबांकडे एका आशेने बघतो, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये एक कृतज्ञतेची भावना आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. तर, माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर एक पुरोगामी महाराष्ट्र घ़डवण्याचं काम पवार साहेबांनी केलं. महिलांना आरक्षण, मराठवाडा विद्यापीठाचा नामांतरचा मुद्दा हे त्याचे उदाहरण आहे, असे प्रतिपादन केले. तसेच, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देशाच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांची यादी बनवायची झालीच तर ती यादी पवार यांचं नाव नमूद केल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. ५० वर्ष पराभव न स्वीकारता कायम समाजासाठी कार्यरत राहणं हे सगळ्यांनाच शक्य नाही. पवार साहेब होते म्हणूनच आम्ही हा महाराष्ट्र पाहू शकलो आणि विविध पदं भूषवू शकलो. अहमदनगरला पाण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. जिल्ह्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावं आणि या सर्व नेत्यांचं मार्गदर्शन शरद पवार यांनी करावं अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वेबदुनिया वर वाचा