शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा स्मृतीदिन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नियोजित स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील जागा घेण्यात आली आहे. परंतु अद्याप त्या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलं नाही. यावरून आता मनसेनं सरकारवर टीका केली आहे. “स्मारक की मातोश्री ३?” असा खोचक सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
“ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना हयातीत सोडलं त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावर बोलू नये,” असं म्हणत संजय राऊत यांनी मनसेला टोला लगावला. हिंदुत्वावरुन भाजपा शिवसेनेवर करत असलेल्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमचं हिंदुत्व प्रमाणित करण्यासाठी, स्प्ष्ट करण्यासाठी इतर कोणत्या पक्षाची गरज नाही. आम्ही प्रखर हिंदुत्ववादी होतो, आहोत आणि राहू, आम्हाला तुमच्याकडून प्रमाणपत्राची गरज नाही. आम्ही कधीच हिंदुत्वाचं राजकारण करत नाही. देशात जिथे कुठे गरज पडेल तेव्हा शिवसेना हिंदुत्वाची तलवार घेऊन हजर राहील”.