संजय राऊतांचा कंगनाला टोला; म्हणाले – ‘त्यांना नशेचा पुरवठा कोण करतं, NCB ने तपास करावा’

बुधवार, 17 नोव्हेंबर 2021 (14:59 IST)
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने काही दिवसापुर्वी देशाबद्दल वादग्रस्त विधान केलं. भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक होती, असं वक्तव्य केल्याने देशभर तिच्यावर टीका होत आहे. यानंतर आता कंगणाने गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वांची खिल्ली उडवत म्हटलं की दुसरा गाल पुढे करून ‘भीक मिळते’ स्वातंत्र्य मिळत नाही. कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर तिच्यावर देशभरातून टीका होतेय. यानंतर आता शिवसेना (Shiv Sena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाला टोला लगावला आहे.
 
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘वेडे लोकं बरळत असतात. ते का बरळतात? ते कोणत्या नशेत असतात? त्यांना या नशेचा पुरवठा कोण करतं? एनसीबीने त्याचा तपास करावा ही माझी मागणी आहे,’ असा टोला राऊतांनी कंगनाला  लगावला आहे. तसेच पुढे राऊत म्हणाले. ‘चीनने आपल्या गालावर थप्पड मारली आहे. चीन लडाखमध्ये घुसला आहे. चीन अरुणाचल प्रदेशात घुसला आहे. तरीही आम्ही दुसरा गाल पुढे केला आहे. काश्मीरमध्ये पंडितांच्या हत्या होत आहेत. या देशात बरंच काही चाललं आहे. हे त्या मॅडमला माहीत असलं पाहिजे.
 
तर, आज देशाची अवस्था काय आहे हे त्यांना माहिती पाहिजे. महात्मा गांधी विश्वनायक होते. त्यांच्याशी काही मतभेद असू शकतात. बाळासाहेबांनीही त्यांच्यावर टीका केली. पण त्यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाला दिशा दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा गांधीजयंतीला राजघाटवर जाऊन गांधीच्या स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहतात. हे या मॅडमना माहित असायला हवं की संपूर्ण देश आणि जग आजही गांधींच्या विचारांनी प्रभावित आहे, असं राऊत म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती