नोटबंदीनंतर आता काळा पैसा जमवण्याऱ्यावर आयकर विभागाने मोठी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आधी बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील बड्या पुरोहितावर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात त्र्यंबकेश्वरच्या दोन पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी टाकल्या आहेत. या धाडीत कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा आणि काही किलो सोने जप्त करण्यात आल्याचे कळते.
त्र्यंबकेश्वरमध्ये पौरोहीत्य मोठ्याप्रमाणात केले जाते. गावातील बहुतांश लोक भिक्षुकीचा व्यवसाय करतात. सोबतच संपूर्ण देशात नारायण नागबली हा विधी फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केला जातो. याशिवाय कालसर्प, त्रिपिंडी, प्रदोष, अभिषेक, मंत्रजागर आदी धार्मिक विधी वर्षभर सुरूच असतात. यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक देशविदेशातुन येत असतात. यातून याठिकाणी दररोज लाखो रुपयांची देवाण घेवाण होत असते. ह्या सर्व पैशांच्या व्यवहाराची कुठल्याच प्रकारची बिले, पावती असे काहीच दिले जात नाही. फक्त ‘दक्षिणा’ या नावाखाली लाखो रुपये जमवले जातात. त्यावर कुठल्याही प्रकारचा कर देखील आकारला जात नाही. त्यामुळे या पैशांचा कुठलाही हिशोब सुद्धा दिला जात नाही. नोटबंदीनंतर याच स्वरूपातला पैसा बँकेमध्ये मोठ्याप्रमाणात जमा करण्यात आला. यातून त्र्यंबकेश्वरमध्ये राहणाऱ्या दोन पुरोहितांकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली. हे दोन पुरोहित कोण आहेत व त्यांचे नाव अद्याप समजू शकले नाही.