याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुनील दत्तात्रय बागूल (वय 67, रा. कृष्णा रेसिडेन्सी, दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक) हे जळगाव येथे पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बागूल हे घरी असताना त्यांना पीयूष शर्मा, राघव शर्मा, विवेक जोशी व संजय कुमार नामक व्यक्तींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्याशी संपर्क साधला. बागूल हे गुंतवणुकीसाठी पर्याय शोधत होते.
ही संधी साधून या चारही आरोपींनी संगनमत करून बागूल यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या परताव्याचे आमिष दाखविले. त्यावर विश्वास ठेवून बागूल यांना पीयूष शर्मा, राघव शर्मा, विवेक जोशी व संजय कुमार यांनी त्यांना पैसे गुंतविण्यास सांगितले. त्यानुसार वरील आरोपींनी बागूल यांच्याकडून दि. 18 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत वेळोवेळी 8 लाख 75 हजार 494 रुपये ऑनलाईन, तसेच विविध बँक खात्यांवर जमा करण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी ही रक्कम जमा केली; मात्र त्यांना जादा परतावा मिळाला नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यावर बागूल यांनी सायबर पोलीस ठाणे गाठले. तेथे चार आरोपींविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.