उद्धव ठाकरेंची औरंगाबाद सभा: 'हृदयात राम हाताला काम, हेच आमचं हिंदुत्व'
बुधवार, 8 जून 2022 (21:42 IST)
औरंगाबाद येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. त्याच बरोबर शिवसेनेचं हिंदुत्व हे केवळ भावनिक नसून सर्वांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवणारं आहे असं ते यावेळी म्हणाले. 'हृदयात राम आणि हाताला काम हाच आमचा नारा आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले.
"पाच दिवसातून एकदा पाणी येतंय. तुम्ही त्या वेदना विसरून इथे आला आहात. विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, सहकारी भेटले. मला त्यांनी सांगितलं की तपशील देऊ इच्छितो. संभाजीनगरातील झारीतले शुक्राचार्य बाजूला काढा," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"समांतर जलवाहिनीचं भूमीपूजन केलं होतं. मी या योजनेचा पाठपुरावा करीन असं म्हटलं होतं. जे वाकडे येतील त्यांना दंड्याने सरळ करा. स्टीलची किंमत वाढली, मटेरिअलची किंमत वाढली. परवाच्या कॅबिनेटमध्ये शासनाने या योजनेची जबाबदारी घेतली आहे. कंत्राटदार आड्याला पाय लावून बसला तर अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांना तुरुंगात टाका.
"निर्णय मी घेतले, सरकारने घेतले. मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला. तो आक्रोश त्यांची सत्ता गेली म्हणून होता.
"निवडणूक आली की तुमच्या तोंडावर काहीतरी फेकायचं. खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही. रस्त्यांमध्ये सुधारणा होत आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
'औरंगाबादमध्ये मेट्रो येणार'
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं आहे. संग्रहालय झालं आहे, अक्वेरियम होतं आहे. गरज लागली तर मेट्रोसाठी तरतूद केली आहे.
विध्वंसक विकासकाम आमच्याहातून झालं नाही. संभाजीनगराची शान वाढवणारं विकास काम असेल.
'शिवसैनिक बाबरी मशीद पाडायला गेलो होते'
आम्हाला चिंता कोणत्या मशिदीखाली शिवलिंग आहे याची. आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? आम्ही हिंदुत्व सोडलंय असं आम्ही काय केलंय? शिवसेनेने हिंदुत्वासाठी काय केलं आणि तुम्ही काय केलं ते खुले होऊन जाऊ द्या.
बाबरी पडल्यावर यांची पळापळ झाली होती. मोरेश्वर सावे आणि संभाजीनगरातले शिवसैनिक तिथे होते. फडणवीसजी सावे नसतील तर त्यांचे चिरंजीव तुमच्याकडे आहेत. आमदार झालेत. त्यांनी सांगावं की बाबा बाबरीला गेले नव्हते.
हनुमान चालिसा म्हणायची आणि दुसरीकडे शिव्या द्यायच्या. यांचे प्रवक्ते बेलगाम बोलत आहेत. तुम्ही शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकत आला आहात. बाळासाहेबांनी इस्लाम, मुस्लीम द्वेष केला नाही. इस्लाम तोडाफोडा सांगितलं नाही. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही.
संभाजीनगर नाव केव्हा होणार
संभाजीनगर कधी करणार? हे कोणी सांगायचं आपल्याला? शिवसेनाप्रमुखांनी दिलेलं वचन आहे. ते केल्याशिवाय मी राहणार नाही. दीड वर्षं विधानसभेत ठराव मंजूर आहे. कॅबिनेटने मान्यता दिली आहे. केंद्राला ठराव दिला आहे.
विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ व्हावे असा प्रस्ताव केंद्राकडे देण्यात आला आहे. केंद्राने हा प्रस्ताव मंजूर करावा.
नामांतर नव्हे. संभाजीनगर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना अभिमान वाटेल असं शहर करेन. नाव बदललं पण तुम्हाला पाणी दिलं नाही तर कसं होईल. नाव दिलं पण रोजीरोटी नसेल तर संभाजी महाराज म्हणतील तुला टकमक टोक दाखवतो. नावाला सार्थ ठरेल असं शहर पाहिजे.
चिखलठाणा विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा. आम्ही तुमचा सत्कार करू.
पंतप्रधानांचा अपमान टिनपाट प्रवक्त्यांमुळे
भाजप प्रवक्त्यांनी प्रेषित मोहम्मदांबद्दल अनुद्गार काढले. मध्यपूर्वेतील देशांनी आपल्याला गुडघे टेकायला लावले. पंतप्रधानांशी मतभेद आहेत पण आपल्या पंतप्रधानांचं छायाचित्र कचराकुंडीवर लावलं. भाजपची भूमिका देशाची भूमिका होऊ शकत नाही.
भाजपचा प्रवक्ता देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही. भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे देशावर ही वेळ ओढवली आहे. हे तुम्हाला पटतं का?
आधीची भाजप देखील राहिली नाही
ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची राहिली नाही अशी टीका केली जाते पण भाजपदेखील आता पूर्वीची राहिली आहे का?
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं विचारलं होतंत. तुम्ही कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
सरसंघचालक मोहन भागवत योग्य बोलले. ते म्हणाले की प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधायला जायची गरज नाही. पण ही गोष्ट भाजपच्या लोकांना कळत नाही ना.
भाजपने हिंदू सणाची कधी पर्वा केली नाही
भाजपने एकदा भारत बंद नारा दिला आपण सोबत म्हणून नाहीतर त्यांची ताकद नाही. गणपतीचा पहिला दिवस बाळासाहेबांना विचारले ते नाही म्हणाले. सुषमा स्वराजांना फोन केला त्या म्हणाल्या गणपती तर दहा दिवस. आपण नाही म्हणालो. पेट्रोल वाढीनंतर बैलगाडीतून जाणारी भाजपा कुठे गेली.
हेच तुम्हाला हवे होते का? प्रवक्ते वाचाळपणे बोलतात. देशाची अब्रू गेली भाजपची नाही. मी विचारतो भाजपला अरे कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान महाराष्ट्र माझा. तुम्ही शिवसेनेला नाही हिंदुत्वाला बदनाम करताय. शिवसेनेचे विचार तुम्ही काढू शकणार नाही.
स्वाभिमान सभा
गेले अनेक दिवस या सभेची तयारी सुरू आहे. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. स्वाभिमान सभा असं या सभेला संबोधण्यात येत आहे. याच मैदानावर राज ठाकरे यांची 1 मे रोजी सभा झाली होती.
मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरातील चौकाचौकात शिवसेनेने बॅनर्स लावले आहेत. यावर हिंदुत्व आणि संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. सभेच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांसोबत संभाजी महाराजांचा पुतळाही ठेवण्यात आला आहे.
शिवसेनेसाठी ही सभा आणि मैदान खास आहे. कारण मराठवाड्यात शिवसेनेची जी पहिली शाखा स्थापन झाली होती तिचा आज 37 वा वर्धापनदिन आहे. आणि याच मैदानातून 8 मे 1988 मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्या निवडणुक प्रचारासाठी बाळासाहेब ठाकरे आले होते आणि त्यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची घोषणा केली होती.
उद्धव ठाकरे यांच्या सभेआधी शहरात शिवसेना आणि भाजप यांच्यात बॅनर युद्ध लागलेलं दिसून येत आहे. हिंदुत्वाचा हुंकार ऐकायलाच हवा, होय हे संभाजीनर, हिंदुत्वाचा गजर आपलं संभाजीनगर असे बॅनर्स शिवसेनेने लावले आहेत.
त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही बॅनर लावले आहेत. हा कसला स्वाभिमान? काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचा की पाणी प्रश्नाचा असा भाजपने बॅनरच्या माध्याम्यून सवाल केला आहे. याशिवाय, "आजचा दिवस हा संभाजीनगर ' नामांतराच्या आश्वासनाचा वर्धापनदिन आहे का," असा सवाल भाजपने केला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मंगळवारी दक्षिण मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलात महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित होते.
राज्यसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
औरंगाबाद इथल्या सभेत मुख्यमंत्री संभाजीनगर नावाची घोषणा करणार का याविषयी उत्सुकता आहे. उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याबाबत मुख्यमंत्री काही बोलणार का यासंदर्भात चर्चा आहे.
गेल्या महिन्यात मुंबईतल्या वांद्रेकुर्ला संकुलात झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीकास्र सोडलं होतं.
मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
-मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही, मुंबईचे लचके तोडाल तर तुकडे तुकडे केले जातील. मुंबई तोडण्याचा डाव सुरू आहे. तुमच्या 1760 पिढ्या आल्या तरी मुंबई तुटणार नाही. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात जनसंघ होता. बुलेट ट्रेन कोणाला हवेय? मुंबई स्वतंत्र करू, असं खरंच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मनातलं ओठावर आलं. मुंबईचा लचका तोडण्याचा मनसुबा आहे. एकदाही संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरला नव्हता. पुरावे असतील तर द्या".
आता हे दाऊदच्या मागे लागले आहेत. उद्या दाऊद म्हणाला मी भाजपमध्ये येतो तर त्याला मंत्री बनवतील. म्हणूनच कदाचित त्याच्यासाठीच मागे लागले असतील. मग तो भाजपमध्ये आल्यावर सांगतील तो कसा गुणांचा पुतळा आहे
-हिंदुत्वाचा भेसूर आणि बेसूर चेहरा समोर येतो आहे. भीषण पद्धतीने अंगावर येत आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत हे शिकवलं जातं का? कधी चिंतन कधी कुंथत बसतात. खोटंनाटं बोललं जातं. आपण खोटं बोलू शकत नाही. खोटं बोलणं हे त्यांच्या हिंदुत्वात बसतं, आपल्या हिंदुत्वात बसत नाही.
-संभाजीनगर आहेच, नामांतराची गरजच काय. कोणाला हनुमान चालिसा द्यायची, कोणाला भोंगा द्यायचा, कोणाला औरंगजेबाच्या कबरीवर पाठवायचं. हे काय करणार- टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. काश्मिरी पंडितांना सुरक्षा नाही
-ज्यांना बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. कधी शाल घालून फिरतात. कधी हिंदुत्वाच्या मागे लागतात. चित्रपटातला मुन्नाभाई लोकांचं भलं करत होता. यांचं काय. राज ठाकरेंच्या डोक्यात मुन्नाभाईप्रमाणे केमिकल लोचा
-मंदिर टिकेल कसं हा विचार केला नाही. मोडता घातला आहे. अशी खाती आहेत ज्यांना तत्व नाही त्यांना पुरा तर पुरातत्व खाती होतील. मंदिराचा एफएसआय वाढवणार नाहीयोत. मंदिर दीर्घकाळ टिकेल यासाठी जीर्णोध्दार करत आहोत. थडग्याची देखभाल करत आहेत पण मंदिरांची देखभाल नाही
-आमचं हिंदुत्व घर पेटवणारं नाही, चूल पेटवणारं आहे. उज्वला योजनेचे बारा वाजले आहेत. फुकट धान्य दिलं, खायचं कसं. शिजवायची सोय काय? हनुमानाचा अपमान करू नका. हनुमानाचं स्तोत्र पाठ आहे. लहानपणी आजोबा म्हणून घ्यायचे. अर्जुनाचं स्तोत्र पाठ आहे. राम, हनुमान हदृयात असायला हवेत.