इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना जामीन मंजुर

मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (16:19 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना मंगळवारी इगतपुरी न्यायालयाने एका खटल्यात जामीन मंजुर केला. खटल्याच्या सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यात त्यांना न्यायालयाने जातीने हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यामुळे मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातील राजसमर्थक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली. 
 
 साल २००८ मध्ये रेल्वेमध्ये परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य मिळाले असल्याने अनेक ठिकाणी मनसेने आंदोलन केले. त्यामुळे राज ठाकरे यांना मुंबईत अटक झाली होती. त्यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ इगतपुरी येथील एका परप्रांतीय हॉटलवर मनसे सैनिकांनी हल्ला केल्याची घटना झाली. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची न्या. के. आय. खान यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यातील सहा आरोपींची यापूर्वीच निर्दोष मुक्तता करण्यात आलेली असली तरी पक्षप्रमुख म्हणून राज ठाकरे यांचे नाव खटल्यात दाखल आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती