पुण्यात पावसाचा अंदाज

शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018 (11:45 IST)
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे नाशिक, नगर, पुणे येथे गारठा वाढला आहे. तसेच वसाला पोषक हवामान होत असल्याने येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
 
उत्तरेकडील थंड हवेचे प्रवाह वाढले असून, दुपारच्या वेळीही गार वारे वाहत असल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे. नाशिकसह नगर, पुण्यात तापमान 14 अंशांच्या आसपास आल्याने थंडी वाढली आहे. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद सुद्धा आज पुण्यात झाली आहे. पुण्यात दिवसाच्या कमाल तापमानात सुद्धा घट होऊन ते 31.9 अंश सेल्सियस पर्यत खाली घसरला आहे. त्यामुळे शहरात गेले दोन दिवसांपासून चांगलीच थंडी जाणवत आहे. कोकण वगळता राज्याच्या कमाल तापमानातही घट होत आहे.
 
दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 4.5 ते4.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असल्याने राज्याच्या दक्षिण भागातही पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. शनिवारी (दि.3) आणि रविवारी (दि.4) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती