पुणे :‘भारत’ नावाबाबत रा. स्व. संघ सुरुवातीपासूनच आग्रही

सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (07:40 IST)
जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. ‘भारत’ या नावाला विशेष महत्त्व असून, हे नाव आपल्या प्राचीन संस्कृतीला अनुसरून आहे. आपला देश हा ‘भारत’ असल्याची संघाची आधीपासून धारणा असून, या नावाबाबत आम्ही सुरुवातीपासूनच आग्रही असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केले.
 
पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय राष्ट्रीय बैठक पार पडली. या बैठकीविषयी संघाचे सहसरकार्यवाह डॉ मनमोहन वैद्य आणि अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन नावांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यासंदर्भात विचारले असता डॉ. वैद्य यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली.
 
वैद्य म्हणाले, जगात कोणत्याही देशाची दोन नावे नाहीत. भारत नावाला एक महत्त्व आहे. ते नाव प्राचीन असून सभ्यता, चिंतन याच्याशी जुळते. या नावासाठी आम्ही पहिल्यापासून आग्रही राहिलो आहोत. कारण आपला देश हा ‘भारत’ असल्याचीच आमची सुरुवातीपासून धारणा आहे. राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून, मंकर संक्रांतीनंतरच्या चांगल्या तीथीवरील मुहूर्तावर प्रतिष्ठापना  केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती