मनमाड रेल्वे विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या सहकारी महिला कर्मचारीचे फोटो स्वतःच्या मोबाईल स्टेटस व सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर ठेवत महिलेचा वेळोवेळी पाठलाग करत होता. या गोष्टीला अखेर कंटाळून पीडित महिला कर्मचाऱ्याने देवीदास संपत पानसरे (रा. एकवई) या कर्मचाऱ्या विरोधात मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून मनमाड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून कर्मचाऱ्यास अटक केली आहे.
शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्टेशन असून, ब्रिज बनविण्याचा इंजिनिअरिंग कारखानादेखील आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे विभागात पुरुष व महिला कामगार काम करीत असतात. कामावर महिलांचे शोषण होते, हे नेहमीच कानावर पडत असते; मात्र रेल्वे विभागातही असा प्रकार घडल्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. रेल्वे विभागात काम करणाऱ्या देवीदास संपत पानसरे हा अनेक दिवसांपासून सोबतच काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याचा वेळोवेळी पाठलाग करून सोशल मीडियाद्वारे रिल्स तयार करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करीत होता.