सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढलेल्या आदेशानुसार, पोलिसांना कामावर असताना मोबाईल वापरण्यास मनाई आहे. जर कोणताही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मोबाईल वापरताना आढळला, तर त्याला 500 दंड होणार आहे. त्यामुळे आता नागरिकांबरोबरच पोलिसांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे. पोलीस आयुक्त शिंदे यांनी काढलेला आदेश सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी, अधिकारी, सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस हे कामावर असताना सतत मोबाईल बघत असतात किंवा मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचे कामातही लक्ष राहत नाही. त्यामुळे कामावर असताना मोबाईलवरील बोलण्यावर आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा आदेश काढला.