भिवंडी, पनवेल, मालेगाव महापालिकांमध्ये सरासरी 50 ते 58 टक्के मतदान

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पनवेल, भिवंडी-निजामपूर आणि मालेगाव या तिन्ही महापालिकांसाठी मतदान झालं. या तिन्ही महापालिकांसाठी सरासरी 55 टक्के मतदान पार पडले. सकाळी 7.30 वाजल्यापासून संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 252 जागांसाठी 1 हजार 251 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 12 लाख 96 हजार 26 मतदारांसाठी 1 हजार 730 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता 26 मे रोजी या महापालिकांचा निकाल जाहीर होणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 26 मे रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
 
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेसाठी 53, मालेगाव महानगरपालिकेसाठी 60, तर पनवेल महानगरपालिकेसाठी 53 टक्के मतदान झालं. नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेसाठी 71.5, नेवासा (जि. अहमदनगर) नगरपंचायतीसाठी 81.4, रेणापूर (जि. लातूर) नगरपंचायतीसाठी 76.7; तर शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी 87.5 टक्के, असं एकूण सरासरी 77.9 टक्के मतदान झालं.
 
तर जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झालं. नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी एकत्रित सरासरी 73.4 टक्के मतदान झालं.
 
पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पनवेलची सत्ता कोण काबीज करतं याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मतदारांनी शेकडो उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद केलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
 
दुसरीकडे, मालेगावमध्ये सत्ता आली तर गोमांस बंदी उठवू असं आश्वासन भाजप उमेदवाराने दिलं आहे. भाजपने मालेगावात 27 मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर मुस्लिम बहुल असलेल्या भिवंडीतही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. 10 महापालिकांमध्ये मोठं यश मिळवल्यानंतर भाजप या महापालिकांमध्येही आपली लाट कायम ठेवणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 
 
भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकांसह धारणी पंचायत समिती, नागभीड नगरपरिषद आणि नेवासा, रेणापूर व शिराळा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक, तसंच सात नगरपरिषदांतील 11 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं.

वेबदुनिया वर वाचा