धरणात लघुशंका करायची भाषा करणारे मराठवाडा दुष्काळमुक्त करणार का, असा सवाल विचारत महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शरसंधान साधलं. परळीमधील वैजनाथ मंदिराच्या विकास कामाच्या उद्घाटनावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
‘कोटींची योजना मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. आपण सगळ्यांनी बातम्या पाहिल्या आहेत. मी सांगते पाच वर्षात हा दुष्काळमुक्त होणार आहे मराठवाडा. आणि हे कोण करणार आहे? ज्यांनी धरणामध्ये लघुशंका करण्याची भाषा केली त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करणारी लोकं करणार आहेत? परळीच्या गटारी साफ करायला जमत नाहीत, हे धरणं साफ करणार आहेत’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं.
या लोकांची लायकी नाही. लायकी नसणाऱ्या लोकांच्या पाठीमागे उभे राहणाऱ्यांची लायकी कमी होते. परळीचे लोक हुशार आहेत. लोकल निवडणुकीत लोकल नेत्याला पकडतात आणि मोठ्या निवडणुकीत मोठ्या नेत्यांना साथ देतात. प्रीतमला नॅशनल लेव्हलला, मला स्टेट लेव्हलला आणि यांना नगरपालिकेत निवडून दिलं, असं म्हणत पंकजा मुंडेंनी बंधू धनंजय मुंडेंवर चौफेर टीका केली.