पंकजा मुंडे यांनी महंत नामदेव शास्त्री यांना एक भावनिक पत्र लिहून भगवान गडावर दसरा मेळाव्याची परवानगी द्या, अशी विनंती केली आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यात नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात चांगलाच वाद झाला होता. याचा संदर्भ त्यांच्या विनंती पत्रात केला आहे. आपल्यात काय झाल या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडेही नाही. पण दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी पहिली आणि शेवटची विनंती करते आहे, असे त्यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिलंय.
याशिवाय मी कोणासमोर कधी झुकले नाही पण समाजासाठी नतमस्तक होते आहे, असा उल्लेखही त्यांनी केला आहे. तेवढे क्षण दिवाळीची माहेरची भेट म्हणून मला द्या, माझ्यासाठी नाही पण त्या चेहऱ्यासाठी जे उजळत राहावेत म्हणून मी संघर्ष यात्रा काढली. समाज बांधण जमलं नाही तर तो तोडणं तरी आपण होऊ देऊ नये. भक्तांना त्रास होऊ नये. कोणत्याही माझ्या भावाला इजा होऊ नये. त्यांच्या भावना जपण्यासाठी कृपया विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.