मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ २० डिसेंबरला होणार

गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (21:18 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २९ वा दीक्षांत समारंभ २० डिसेंबरला विद्यापीठ मुख्यालयात होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्‍यांची उपस्‍थिती निश्‍चित करण्याच्‍या सूचना विद्यापीठाने दिल्‍या आहेत. दीक्षांत समारंभात २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात (डिसेंबर २०२२, मार्च २०२३ व मे/जून २०२३ या परीक्षांमध्ये) उत्तीर्ण झालेल्या पदवीधरांना प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
 
विद्यापीठ मुख्यालय येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवीग्रहण करण्यासाठी येणार असलेल्‍या विद्यार्थ्यांनी https://29convocation.ycmou.ac.in/attendance या लिंकवर जाऊन उपस्थितीबाबतची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्याच्‍या सूचना विद्यापीठाने दिल्‍या आहेत. त्‍यासाठी ११ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली. नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमाच्‍या दिवशी प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार असल्‍याचेही नमूद केले आहे.
 
नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांची पदविका/ पदवी प्रमाणपत्रे दीक्षांत समारंभानंतर काही कालावधीत त्यांच्या अभ्यासकेंद्रामार्फत वितरित केली जाणार आहेत. त्यांनी विद्यापीठात येण्याची आवश्यकता नाही, असे विद्यापीठाने कळविले आहे.
 
दीक्षांत समारंभाच्या दिवशी सकाळी नऊला हजर राहून अनामत रक्कम ५०० रुपये रोख भरून दीक्षांत शाल घ्यायची आहे. पीएच.डी. या पदवीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी उपस्थितीबाबत माहिती नोंदविण्याची आवश्यकता नाही. त्यांची उपस्थिती ग्राह्य धरली आहे. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव तथा परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती