येत्या शुक्रवारी २३ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा होणार आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने घोषित केलेल्या या दिनामध्ये मुव्हीमॅक्स ही सिनेमागृहांची शृंखला देखील सामील होणार आहे. राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त मुव्हीमॅक्सच्या कोणत्याही सिनेमागृहात अवघ्या ७५ रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. भारतातील सुमारे ४००० मल्टिप्लेक्स सिनेमागृह हा दिन साजरा करणार आहेत. मुव्हीमॅक्सच्या नाशिक, मुंबई, ठाणे, मीरा रोड, नागपूर, गाझियाबाद आदी ठिकाणी राष्ट्रीय सिनेमा दिन साजरा केला जाणार आहे.
प्रादेशिक सिनेमांबद्दलची आवड वाढत आहे, तसेच प्रादेशिक भाषांत मोठ्याप्रमाणावर चित्रपट निर्मिती होत आहे. ज्यामुळे सिनेमागृहाच्या व्यवसायाला चालना मिळाली आहे. चित्रपट उद्योगाचा विकास आणि वाढ साजरी करण्यासाठी, मुव्हीमॅक्स सवलतीच्या दरात चित्रपट तिकिटांची किंमत निश्चित करण्याच्या घोषित कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या निश्चित तिकीट दरामध्ये सर्व वयोगटातील चित्रपट प्रेमींना चित्रपट पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे.
या उपक्रमाबद्दल आपले विचार मांडताना, सिनेलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कनाकिया म्हणाले, “राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त, आम्ही, मुव्हीमॅक्स मध्ये फक्त ७५ रुपयांमध्ये चित्रपट दाखवणार आहोत. चित्रपट रसिकांचे प्रेम आणि समर्थन स्वीकारण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे ज्यांच्यामुळे चित्रपटगृहांना कोरोनानंतर व्यवसाय पुन्हा सुरू करणे शक्य केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून चित्रपट आपले मनोरंजन करत आहेत. हा दिवस त्याचे कौतुक करण्याचा आहे. कोरोनाकाळातील आव्हानांमध्ये आमच्या पाठीशी उभे राहिलेल्या चित्रपटप्रेमींचे मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी देखील हा दिवस समर्पित आहे. माझा विश्वास आहे की चित्रपट आणि चित्रपट रसिकांचा सन्मान करण्यासाठी आपण हा दिन दरवर्षी साजरा केला पाहिजे.”