ओखी वादळामुळे कोकणातील आंबा, काजू, सुपारी, कांदा तसेच इतर पिकांच्या बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची लक्षवेधी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आज सभागृहात उपस्थित केली. यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले ,किरण पावसकर , विद्या चव्हाण यांनी सहभागी होत प्रश्न उपस्थित केले.
ओखी वादळाचे संकट नवे असून अशा संकटांना पुढील काळात तोंड देण्यासाठी राज्य सरकारने आपल्या यंत्रणेचे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे मत टकले यांनी व्यक्त केले. आंब्याचे मोहर येणार नसल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान सध्या दिसत नसले तरी ते नुकसानच असते. त्यामुळे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन पंचनामे करणार का, असा प्रश्न पावसकर यांनी विचारला. बोंडअळी किंवा उर्वरित महाराष्ट्रात शेतीच्या नुकसानीचे जे निकष लावले जातात, ते निकष कोकणातल्या फळबागांना लावून जमणार नाही, अशी भूमिका किरण पावसकर यांनी मांडली.
कोकणावर नेहमीच अन्याय केला जातो. शेती व मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यात दुजाभाव होत असल्याची टीका विद्या चव्हाण यांनी केली. किती नुकसान झाले याची तपासणी करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. ओखीसारख्या वादळाचा प्रश्न नवीन आहे. याबाबत कोकणातील सर्व सदस्यांना सर्वांनी एकत्र घेत बैठक घेऊ असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.