मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी बेमुदत उपोषणासाठी बसलेले ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी अकराव्या दिवशी (22 जून) त्यांचं उपोषण स्थगित केलं आहे. सलग दुसऱ्या दिवशी सरकारी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली आहे.
आज (22 जून) सलग दुसऱ्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. या भेटीनंतर हाके यांनी हे उपोषण स्थगित केल्याचं सांगितलं आहे.
या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन, मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता.
शुक्रवारीही (21 जून) शिष्टमंडळानं हाके यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर संध्याकाळी 5 वाजता ओबीसींचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली आहे.
लक्ष्मण हाके यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी बरीच चर्चा झाली. यापैकी काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलं आहे. त्यामुळे सरकारी शिष्टमंडळाचा मान राखून लक्ष्मण हाके यांनी उपोषण थांबवलं यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो."
कालच्या बैठकीनंतर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, "ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांना समोरासमोर बसवून चर्चेतून तोडगा काढण्याची भूमिका ओबीसी नेत्यांनी बैठकीत मांडली. ओबीसींसंदर्भात एक समिती निर्माण करण्यात येईल.जातपडताळणी कशी करावी? त्यात पूर्तता कशी करावी यासंदर्भात एक डाॅक्युमेंट आहे. सगेसोयरे संदर्भात वेगळं डाॅक्युमेंट करण्याची गरज नाही."
भुजबळ म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की, "मराठा समाजावर अन्याय करणार नाही. भटक्या विमुक्तवर देखील अन्याय करणार नाही. यासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल आणि प्रश्न कसा सोडवायचा असं देखील बघू."
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे सुरु असलेल्या लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "वडीगोद्रीला आम्ही जाऊ आणि त्यांना सांगू की उपोषण संपवा. सर्व पक्षीय बैठकीत भाग घेता येईल असंही आम्ही त्यांना सांगू. आम्ही जे आहे ते त्यांना बोलू, मी स्वत: जाणार, ती माझी लोकं आहेत, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. लेखी आश्वासन घेऊन जाणार नाही, ती माझी लोकं आहेत."
शिष्टमंडळ आणि उपोषणकर्ते यांच्यात चर्चेला सुरुवात झाल्यावर शिष्टमंडळाकडून उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांना कागदपत्र देण्यात आले.
दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी सरकारचे शिष्टमंडळ भेटीला आल्याच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं की, "आम्ही गेले 8/9 दिवस महाराष्ट्र सरकारकडे भूमिका मांडत आलोय. शासन म्हणतंय ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. आंदोलनकर्ते म्हणतात आम्ही आधीच ओबीसी आरक्षणात आहोत."
हाके पुढे म्हणाले की, "दोघांपैकी खरं कोण, दोन्ही एकाच वेळी खोटं बोलू शकत नाहीत. ग्रामीण भागातील ओबीसी समाज नाराज आहे. एक दरी या माध्यमातून निर्माण केली जातेय. ठराविक लोकांच्या आंदोलनाला सरकारने रेड कार्पेट घालू नये, आमचा आरोप आहे."
काही मागण्या मान्य झाल्या आहेत आता सर्वपक्षीय बैठकीनंतर सरकार अध्यादेश काढणार
शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर लक्ष्मण हाके म्हणाले की, "आमच्या दोन मागण्या सरकारनं मंजूर केल्या आणि दोन मागण्यांबाबत तांत्रिक कारणामुळे थांबल्यात. खोटी कुणबी दाखले घेणारे आणि देणारे यांच्यावर आम्ही कारवाई करू, असं सरकारनं आम्हाला सांगितलंय. आम्हाला सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. हे आंदोलन स्थगित झालेलं आहे. वरिष्ठ आणि संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आंदोलन स्थगित केलंय, थांबवलेलं नाही."
हाके म्हणाले की, "ओबीसी बांधवांना विनंती आहे की, आपल्या आंदोलनामुळे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालोय. विजयी अद्याप झालो नसलो, तरी लक्ष वेधून घेतलंय."
या होत्या ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या
बांठिया आयोगाचा रिपोर्ट आम्हाला मान्य नाही, जातनिहाय जनगणना करा.
ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा.
सगेसोयरे सूचना आणि हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा.
जातपडताळणी नियम असताना सगेसोयरे अध्यादेशाची गरज का? सगेसोयरे बाबत अध्यादेश काढू नका.
सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन नंतर निर्णय घ्या, घाई करू नका.
आंदोलकांचे उपोषण लवकर सोडवणे आवश्यक.
भुजबळ मराठा आणि धनगरांमध्ये भांडण लावतायत - मनोज जरांगे
लक्ष्मण हाके यांनी आंदोलन स्थगित केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की, "एकही कुणबी नोंद रद्द झाली तर सरकारला याची मोठी किंमत मोजावी लागेल.
छगन भुजबळ मराठा आणि धनगर बांधवांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळे ओबीसी नेते मराठ्यांचं मतदान घेत होते पण आता त्यांचा बुरखा फाटला आहे. हे नेते किती जातीवादी आहेत हे आता तुम्हाला कळलं असेल."
मराठा नेत्यांना संबोधून मनोज जरांगे म्हणाले की, "माझं मराठा नेत्यांना आवाहन आहे की आपण एकटेच पन्नास ते पंचावन्न टक्के आहोत त्यामुळे तुम्ही त्यांच्या मतांची चिंता करू नका. छगन भुजबळ मराठ्यांना आव्हान देत असतील तर आम्हीही आता त्यांचं चॅलेंज स्वीकारलं आहे.
उपोषण सुरु असताना उपोषण बसवता, दंगली घडवून आणण्यासाठी. यांचं निर्णायक मतदान आहे असं मराठा नेत्यांना वाटतं, कशाचं निर्णायक मतदान आहे रे? गिरीश महाजन, अतुल सावे मराठ्यांचं मतदान घेत नाहीत का?"