आता अहमदनगरच्या ऑक्सिजनला जिल्हाबंदी

शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (09:21 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांकडून वितरणात भेदभाव होत असल्याचा आरोप खासगी रुग्णायांकडून करण्यात येत होता. नगरच्या काही कंपन्यांतून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जातो. त्यामुळे नगरला पाच कंपन्या असूनही तुटवडा निर्माण झाला आहे.या तक्रारी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आदेश काढून ऑक्सिजनसाठी जिल्हाबंदी लागू केली.
 
या आदेशामुळे आता नगरमधील पाचही कंपन्यांना नगर जिल्ह्यातच आणि ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागणार आहे. औद्योगिक क्षेत्राला ऑक्सिजन देण्यास यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.
 
नगर एमआयडीसीमध्ये तीन तर श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यात प्रत्येकी एक कंपनी आहे. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला असून जिल्हाबाहेर ऑक्सिजन पाठवू नये आणि शंभर टक्के ऑक्सिजन कोविड रुग्णालयांनाच देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.
 
नगर जिल्ह्यात सध्या दररोज सुमारे ५० टन ऑक्सिजन लागतो आहे. या सर्व कंपन्यांचा ऑक्सिजन मिळाला तरीही तो कमी पडणार असून बाहेरचा ऑक्सिजन आणावा लागणार आहे.
 
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी संबंधित ऑक्सिजन कंपन्यांनी पुरवठा संबंधी करार करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती