शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल
शिवसेनेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्रातून निर्धार व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. भाजपशी ‘युती’ जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. याच निर्धाराने आम्ही उद्याची विधानसभा ‘भगवी’ करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला, याच निर्धाराने काम करुया.
53 वर्षापूर्वी 19 जून रोजी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी आणि हिंदू माणसांच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली होती.
मांडण्यात आलेले महत्त्वाचे मुद्दे
शिवसेना म्हणजे काय? हे महाराष्ट्राने किंवा देशानेच नव्हे तरसंपूर्ण जगाने गेल्या 53 वर्षांत अनुभवले आहे. मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी 19 जून हा भाग्याचाच दिवस मानावा लागेल. याच दिवशी शिवसेना नामक एका वादळाचा जन्म झाला.
वादळे आणि वावटळी अनेकदा येतात आणि जातात, पण शिवसेना नावाचे वादळ 52-53 वर्षे सतत घोंघावत आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जीवनाच्या 50 वर्षांची आहुती दिली तो त्याग, संघर्ष, चढ-उतार नव्या पिढीने पाहिले नाहीत. पण शिवसेनेने चार पिढय़ा निश्चितच घडवल्या व शिवरायांचा भगवा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीच्या हाती जात आहे हे महत्त्वाचे. शिवसेनेचा वटवृक्ष आज बहरला आहे. महाराष्ट्रात त्याची पाळेमुळे घट्ट रुजली, फांद्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचल्या.
मराठी माणूस हा या जगाचा एक घटक आहे. हिंदुस्थानचा अभिमानी आहे. हिंदू संस्कार आणि संस्कृतीचा तो रक्षक आहे, असे व्यापक तत्त्वज्ञान स्वीकारून मराठी बाणा जपणारी मंडळी शिवसैनिक आहेत. शिवसेनेचे सामर्थ्य सत्ता-पदात नसून ते चळवळीत आहे. चळवळ हाच शिवसेनेचा आत्मा आहे.
या चळवळी जशा मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, हिंदूंचा स्वाभिमान यासाठी झाल्या त्यापेक्षा या चळवळी जनतेच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्नांवर अधिक झाल्या. सुरुवातीच्या काळात महागाईविरोधात लाटणे मोर्चे, पाण्यासाठी हंडा मोर्चे, गहू-तांदूळ, तेलासाठी आंदोलने झाली. ती आंदोलने आता शेतकऱ्याच्या प्रश्नांवर होत आहेत. पण त्याच्या जोडीने राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी पाणीवाटप, चारा छावण्या, अन्नछत्रापर्यंत हे समाजकार्य पोहोचले आहे. शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो.
शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. शिवसेनेने भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांचा लढा दिला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा मराठी अस्मितेचा होता. मुंबई मिळाली. त्या मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, पोटापाण्याचा आणि रोजगाराचा प्रश्न शिवसेनेने उचलला तेव्हा काय गहजब झाला!
शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचे आणि देवळातल्या घंटा बडवण्यापुरते नव्हते. त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. राष्ट्रद्रोही, मग ते कोणत्याही धर्माचे असतील त्यांना या देशात थारा नाही हे त्यांचे हिंदुत्व.
राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिमेची प्रेतयात्रा काढणाऱया आणि समान नागरी कायद्याची होळी करणाऱया जात्यंधांना या देशात थारा नाही, असे खणखणीतपणे सांगणारे, परिणामांची पर्वा न करता ही भूमिका पुढे नेणारे एकमेव हिंदुहृदयसम्राट म्हणजे बाळासाहेब ठाकरे.
प्रश्न धर्माचा नसून, मनात दडलेल्या राष्ट्रद्रोही विषवल्लीचा आहे. देशात धर्म अनेक असू शकतील, पण राष्ट्रात घटना एक हवी आणि कायदे सर्वांना सारखेच हवेत. समानता विचारात हवी, आचारात हवी.