राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूर लोकसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच शिरूरमधून निवडणूक लढवतील, त्यांना निवडून देण्यासाठी कामाला लागा असा आदेश शरद पवार यांनी आज झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत दिला. त्यामुळे अमोल कोल्हे की विलास लांडे या वादावर आता पडदा पडला आहे.
मागील काही दिवसांपासून अमोल कोल्हेंच्या शिरुरमधील उमेदवारीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे यांनी शिरुर लोकसभेसाठी आपण इच्छुक असल्याचे म्हटले होते. आज लोकसभा मतदार संघांमधील निवडणुकीबाबत पुण्यात राष्ट्रवादीची आढावा बैठक झाली. या बैठकीत लांडे यांचा पत्ता कट करत डॉ. अमोल कोल्हे हेच लोकसभेची निवडणूक लढवतील, यावर पवारांनी शिक्कामोर्तब केले.
त्यानंतर बोलताना लांडे म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे. मी कुठून निवडणूक लढवायची याबाबत अजून कुठेही स्पष्ट झालेले नाही, मात्र पक्ष जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन. अमोल कोल्हे यांनी आता वर्षभरात त्यांचा जनसंपर्क वाढवावा आणि निवडणुकीला लोकांसमोर जावे, असेही लांडे म्हणाले.
यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, लोकसभेच्या जागेसंदर्भात आज पक्षाची आढावा बैठक झाली. या बैठकीत एकूण कामकाजाचा आढावा घेण्यात आला. शरद पवार यांना मी मागील चार वर्षांच्या काळातील कामकाजाबद्दल माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण अंतिम निर्णय योग्यवेळी पवारसाहेब घेतील. ते सांगतील ते धोरण, अन् ते बांधतील ते तोरण!, असेही कोल्हे म्हणाले.