वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहात, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर हल्लाबोल केला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमागे एका राष्ट्रवादी महिला नेत्याचा समावेश असल्याचा आरोप केला. राहुल शेवाळेंच्या या आरोपानंतर रुपाली ठोंबरे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
एका वृत्तवाहिनीशी बातचीत करताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, “मी राहुल शेवाळेंची पत्रकार परिषद पूर्ण ऐकून त्या पीडित मुलीबरोबर पोलिसांसमोर पत्रकार परिषद घेणार आहे. हे प्रकरण झाले तेव्हा महाविकास आघाडीचा सत्ता होती. त्यावेळी राहुल शेवाळे हे शिवसेनेचे खासदार होते. मला वाटते एखाद्या खासदाराने वैयक्तिक अनैतिक संबंधांमध्ये दाऊद, एनआयए आणणे म्हणजे बिकट परिस्थिती आहे. खासदार राहुल शेवाळे यांचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते तिचा दाऊदशी संबंध असल्याचे मानले, तर मग शेवाळेंनीच त्या संबंधामध्ये असताना देशाच्या हिताची गोपनीय माहिती तिला सांगितली नसेल ना. ती माहिती तिने पुढे दाऊदला दिला असेल. हे विचारणे भाग आहे”.
“राहुल शेवाळे खासदार आहेत आणि त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं. असं असताना ते सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहेत. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. आम्ही मुर्ख नाही. शेवाळेंनी जे व्हिडीओ ऐकवले ते दोन वकिलांमधील व्हिडीओ आहेत. एक शेवाळेंचा वकील आणि एक पीडितेचा वकील आहे. ते वकील काय बोलले ते राहुल शेवाळे किंवा पीडित महिलेवर लादलं जाऊ शकत नाही. दोन वकील हे प्रकरण निकाल काढण्यासाठी काहीही बोलू शकतात. पीडित महिलेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तिच्या जीवाला राहुल शेवाळेंपासून धोका आहे”, असेही रुपाली ठोंबरे म्हणाल्या.