राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे होम क्वारंटाइन

बुधवार, 8 जुलै 2020 (17:33 IST)
राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे हे सध्या क्वारंटाइनमध्ये आहेत. करोना पॉझिटिव्ह असलेल्या दोन नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला. “मी एक डॉक्टर असल्यानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये, या भावनेतून होम क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती डॉ. कोल्हे यांनी ट्विट करून दिली आहे.
“जय शिवराय!
नमस्कार,
आपल्याला एक महत्वाची माहिती शेअर करत आहे.एक जुलै ते चार जुलै या कालावधीत मतदारसंघाच्या दौऱ्यावर होतो. दौऱ्याच्या काळात संपर्क आलेले दोन राजकीय नेते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाले. हे समजल्यानंतर मी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली असून ती निगेटिव्ह आलेली आहे. माझ्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र पुरेशी खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय मी घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात अथवा दौऱ्यावर असताना. अनेकदा नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीत. काही जण मास्कचा वापर करीत नाहीत. मी स्वतः डॉक्टर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपल्यामुळे कुणाचे आरोग्य धोक्यात येऊ नये या भावनेतून मी होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मी घरी असलो तरी माझ्या मतदारसंघाबरोबर इतर भागातील नागरिकांच्या संपर्कात राहून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती