नवाब मलिक : 'समिर वानखेडेंकडे 50 हजारांचा शर्ट, एक लाखाचा पट्टा आणि अडीच लाखांचे बूट'
मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (11:52 IST)
नवाब मलिक यांनी ड्रग्ज कनेक्शन प्रकरणांवरून आरोपांचं सत्र मंगळवारीही सुरुच ठेवलाय. भाजप नेत्यांच्या पत्नी किंवा कुटुंबांतील महिलांवर आरोप करतं, तेव्हा त्या महिला नसतात का? असा प्रश्न उपस्थित करत मलिक यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांवरून होत असलेल्या टीकेला उत्तर दिलंय.
नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेत त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत काही नवे आरोपही केले आहेत.
अंडरवर्ल्डशी संबध असल्याच्या फडणवीसांच्या आरोपांवरही मलिक यांनी उत्तर दिलं. फडणवीसांच्या पाच वर्षांच्या काळात 15-15 कोटींच्या पार्ट्या होत असताना कारवाई का केली नाही, असंही ते म्हणाले. समीन वानखेडेंवर आरोप करताना मलिक यांनी त्यांच्या महागड्या जीवनशैलीवरूनही टीका केली.
प्रामाणिक अधिकाऱ्यांना कोट्यवधींचे कपडे कसे परवडतात असा सवालही त्यांनी केला आहे. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेली कारवाई, ही इतर नेत्यांना घाबरवण्यासाठी आणि धमकावण्यासाठी असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
इतरांच्या कुटुंबातील महिला या महिला नाहीत का?
नवाब मलिक यांनी अमृता फडवणीस यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केल्यामुळं होणाऱ्या टीकेवर उत्तर दिलं. मी कुणाच्या तरी पत्नीवर आरोप करतोय, महिलांवर आरोप करतोय असे आरोप होत आहेत, असं ते म्हणाले. "गेल्या 26 दिवसांत दोन महिलांशिवाय मी कोणत्याही इतर महिलांवर आरोप किंवा कुणाचा उल्लेख केलेला नाही. दोन्ही महिलांचा उल्लेख आला कारण, त्यांच्याशी संबंधित काही बाबी आहेत.
मात्र, तुम्ही आरोप करता त्या इतरांच्या कुटुंबातील महिला कुणाच्या आई, बहीण पत्नी नाहीत का? असं मी जे लोक महिलांबाबत मुद्दे उपस्थित करत आहेत त्यांना मी विचारू इच्छितो.""किरिट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या आईचा उल्लेख केला, बहिणीचा उल्लेख केला. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवलं. खडसेंच्या पत्नीला ईडीच्या कार्यालयापर्यंत पोहोचवलं. किरिट सोमय्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वारंवार नाव घेऊन आरोप करत आहेत."
आरोप झाले की, त्यांच्या घरातील महिला महिला आहेत, आणि इतरांच्या घरातील महिला महिला नाहीत का? असा सवाल करत आरोपांचा स्तर भाजपनं खाली आणला आहे आम्ही नाही असं मलिक म्हणाले.
मी जे आरोप लावले त्यापैकी एकही हवेत केलेला नाही. ड्रग पेडलर गाण्याचा फायनान्स हेड आहे असे आरोप आम्ही केले होते, असंही मलिक म्हणाले.
फडणवीस माफी मागतील का?
देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर काही आरोप केले. मी आरोपांनंतर कधी माफी मागत नाही असं ते म्हणाले. पण नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरून गांजा मिळाला, असं ते म्हणाले. पण तुम्ही पंचनामा मागवा त्यात, हे खरं नाही हे तुमच्या लक्षात येईल, असं नवाब मलिक म्हणाले.
माझ्या जावयाच्या घरी छापा मारला तेव्हा माध्यमांतही मोठ्या प्रमाणावर गांजा मिळाला अशा बातम्या चालल्या. माध्यमांचीही दिशाभूल करण्यात आली, त्यासाठी देवेंद्र फडणवीस माफी मागतील का? असं मलिक म्हणाले.
चार्जशीट कमकुवत करण्यासाठी वानखेडेंवर हल्ला करत आहेत, असाही आरोप मलिकांवर करण्यात आला. पण फडणवीस हे वकील आहेत. पण एनडीपीएस अॅक्टमध्ये सहा महिन्यांत चार्जशीट दाखल करावं लागतं, हे त्यांना माहिती नाही का? सजलानी आणि समीर खान प्रकरणी चार्जशीट दाखल आहे. त्यामुळं या आरोपासाठी ते माफी मागणार का? असंही मलिक म्हणाले.
मुख्यमंत्री असताना गप्प का?
फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असं म्हटलं आहे. पण तुम्हाला वाट पाहायची गरज नाही. माझे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं फडणवीस सांगत आहेत. पण 62 वर्षं याच शहरात गेली. माझ्याकडे या मुद्द्यवर बोट दाखवण्याची कुणाची हिम्मत नाही, असं मलिक म्हणाले.
तुम्ही पाचवर्षे राज्याचे प्रमुख होते. गृहविभाग तुमच्याकडे होता. पाच वर्षे सरकारच्या विरोधात कामावर प्रश्नचिन्हं उचलण्याचं काम मी केलं, तेव्हाच माझ्यावर कारवाई का केली नाही, असंही मलिक म्हणाले.
राज्याचा प्रमुख म्हणून तुम्ही अशी माहिती मिळाल्यास कारवाई करायला हवी होती. त्यामुळं समोर येणारी प्रकरणं दाबवण्यासाठी अशा फक्त हवेत गप्पा करून फायदा नाही, असंही मलिक म्हणाले.
मलिक यांनीच यावेळी फडणवीसांवर आरोप केले. फडणवीसांच्या काळात फोर सिझन हॉटेलमध्ये सलग एका पार्टीचं आयोजन होत होतं. त्या पार्टीचे आयोजक कोण आहेत? त्या पार्टीत एका टेबलची किंमत 15 लाख असायची. अशा 15-15 कोटींच्या पार्टीचे आयोजक कोण होते? हे तुम्हाला माहिती नव्हतं का? सरकार बदलल्यानंतर ही पार्टी बंद झाली. त्याबाबत तुम्हाला माहिती नव्हती का? याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.
वानखेडेंची प्रायव्हेट आर्मी
वानखेडे आले तेव्हापासून त्यांनी वसुलीसाठी त्यांची प्रायव्हेट आर्मी तयार केली. त्यात किरण गोसावी, मनीष भानुशाली, फ्रेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसुजा, इलू पठाण या सर्वांचा समावेश होता, असा आरोप मलिक यांनी केला.
ही प्रायव्हेट आर्मी शहरात ड्रग्जचा व्यवसाय करते. छोटी-छोटी प्रकरणं समोर येतात आणि मोठी प्रकरणं सुरू राहतात. असा आरोपही त्यांनी केला.
आर्यन खान प्रकरणात साईल यानं 18 कोटींच्या डीलचा आरोप केला होता. त्यात सॅम डिसुजा समोर आला आहे, तो डील असल्याचं सांगत आहे. एवढे दिवस तो गायब होता, आता एनसीबीचा यात सहभाग नसल्याचं सांगत आहे. पण त्याला शिकवून समोर आणलं आहे, असा आरोप त्यांनी केला.
एनसीबीचा यात समावेश नव्हता किरण गोसावी कार्यालयात काय करत होता. ही संपूर्ण कारवाई बनावट होती. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलं, असंही ते म्हणाले.
'50 हजारांचा शर्ट, लाखोंच्या घड्याळं'
वसुलींचे आरोप करताना मलिक यांनी वानखेडेंच्या महागड्या जीवनशैलीवरही आरोप केले. 2020 मध्ये समीर वानखेडे आल्यानंतर एनसीबीनं एक खटला दाखल केला. त्यात सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोन यांना बोलावण्यात आलं. आजपर्यंत ती केस बंद झालेली नाही किंवा आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. याच केसअंतर्गत हजारो कोटींची वसुली झाली, असा आरोप मलिकांनी केला.
मालदीवमध्ये वसुली झाली असा आरोप मलिक यांनी केला आहे. मालदीवचा एवढ्या लोकांचा दौरा सोपा नसतो. त्याचा खर्च लाखोंमध्ये असतो. तो खर्च कोणत्या अकाऊंटवरून झाला याचा एनसीबीनं चौकशी करावी, असंही मलिक म्हणाले.
50 हजारांचा शर्ट घालणारे वानखेडे रोज नवे कपडे घालून समोर येतात. मोदींपेक्षाही ते पुढं निघून गेले. एक लाखांचा पट्टा, अडीच लाखांचे बूट, 25-30 लाखांची घड्याळं, ते परिधान करतात असं मलिक म्हणाले.
या काळात त्यांनी परिधान केलेल्या कपड्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे. एक प्रामाणिक अधिकारी एवढा खर्च करू शकतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
लेडी डॉनबाबत पुनरुच्चार
मी लेडी डॉनचा उल्लेख केला तेव्हा आमचा भाऊ प्रामाणिक अधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. मात्र ड्रग्ज प्रकरणी अटकेशी संबंधित एका व्यक्तीचे जास्मीन वानखेडे बरोबरचे संभाषण असलेलं व्हाट्सअॅप चॅट मलिकांनी सादर केलं. हा सर्व प्रायव्हेट आर्मीचा खेळ होता, वसुलीचा खेळ सुरू होता आणि लेडी डॉनसह सगळे प्रायव्हेट आर्मीचे लोक यात सहभागी होते, या आरोपाचा पुनरुच्चार त्यांनी केला.
"मी बोलू नये म्हणून हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे द्यावं यासाठी वानखेडे चकरा मारत आहेत. तुम्ही खरे आहात, तर मग चौकशी होऊ द्या," असं आव्हानही मलिकांनी केलंय.
"व्ही. व्ही सिंग नावाच्या एनसीबी अधिकाऱ्यावरही मलिकांनी आरोप केला. व्ही.व्ही.सिंगच्या साथीनं वसुली सुरू होती. माझ्या जावयाच्या प्रकरणात लँड क्रुझरची मागणी करण्यात आली होती, असा आरोपही त्यांनी केला.
वानखेडेंवर कारवाई झाल्यानंतर या प्रकरणी आणखी काही लोक समोर येतील. ज्यांच्याकडून वसुली झाली त्यांनी समोर यावं, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
मविआच्या नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न - संजय राऊत
अनिल देशमुख यांना ईडीनं केलेली अटक हा दुर्दैवी प्रकार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. अनिल देशमुख न्यायालयीन लढाई लढत होते. ही अटक माझ्य मते कायद्याला आणि नितीमत्तेला धरून नाही, असं राऊत म्हणाले.
देशमुख यांच्यावर आरोप करणारे पळून गेलेले नाहीत, तर त्यांना पळवून लावलं आहेत. कोणीही केंद्रीय सत्तेच्या मदतीनेच देशाबाहेर पळून जातो. महासंचालक दर्जाचा अधिकारी देश सोडून जातो तेव्हा त्याला केंद्रीय सत्तेचं पाठबळ असल्याशिवाय तो पळून जाऊ शकत नाही, असं राऊत म्हणाले.
चौकशी किंवा तपास करायला हरकत नाही. पण देशमुख पहिल्यांदाच ईडीसमोर हजर झाले तेव्हा त्यांना अटक होणं, चुकीचं असल्याचं राऊत म्हणाले.
हे सर्व ठरवून चाललं आहे. मविआच्या प्रमुख नेत्यांना त्रास द्यायचा, त्यांना बदनाम करायचं काम सध्य सुरू आहे. अजित पवारांशी संबंधित लोकांवरही आज कारवाई झाली आहे. भाजपचे लोकं सगळे जंगलात राहतात का? त्यांच्या काही प्रॉपर्टी नाही किंवा त्या सगळ्या वैध मार्गानं मिळवलेल्या आहेत का, असं राऊत म्हणाले. आम्ही अनेकांबाबत माहिती ईडीला दिली आहे. त्याला आजवर हात लागलेला नाही. त्यांची कुटुंबं ही कुटुंब आहेत मग आमची कुटुंब रस्त्यावर आली आहेत का? भाजपनं सुरू केलेलं हे घाणेरडं राजकारण त्यांच्यावर उलटेल असं राऊत म्हणाले.