गेल्या आठ तासांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असल्याने गंगापूर धरणातून आज सायंकाळपासून विसर्ग सुरु करण्यात आलेला आहे. रात्री नऊ वाजता गंगापूर धरणातून १७१३ क्यूसेक्स तसेच दारणा धरणातून ८९८५ क्यूसेक्स विसर्ग सुरू आहे. दरम्यान जिल्हा प्रशासना कडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गंगापूर धरण १०० टक्के भरले आहे व धारण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याचे गंगापूर धरणातून १७१३ क्युसेक्स इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे , त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळीत वाढ झाली आहे. तरी नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत नदी, नाले, ओढा यामध्ये प्रवेश करु नये तसेच पुलावरुन पाणी वाहत असल्यास पुल ओलांडून नये. विद्युत खांबापासून दूर रहावे. जनावरांना नदीपत्रापासून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहत्या पाण्यामध्ये कोणीही पोहण्याचा प्रयत्न करु नये, तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, धोकेदायक क्षेत्रात सेल्फी काढू, पंचवटी क्षेत्रातील भाविकांची वाहने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावी. असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.