कावनई तीर्थक्षेत्राचाही होणार विकास

गुरूवार, 23 मार्च 2017 (20:40 IST)
केंद्रीय पर्यटन विभागाच्या स्वदेश योजनेअंतर्गत रामायणात उल्लेख झालेल्या ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांचा ‘रामायण सर्किट’ याेजनेत नाशिकचा समावेश करण्यात आला असून या माध्यमातून या स्थळांचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाणार आहे.
 
महाराष्ट्रातीला नाशिकसह नागपूर शहराचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रभू रामांच्या वास्तव्याचा इतिहास असलेली स्थळे या याेजनेतून उजळविण्यात येणार अाहेत. उत्तर प्रदेशातील अयाेध्या, श्रींग्वेरपूर, नंदीग्राम, चित्रकूट तसेच बिहारमधील सीतामढी, बक्सर, दरभंगा अाणि अाेडिशातील महेंद्रगिरी, छत्तीसगडमधील जगदिलपूर, तेलंगणातील भद्रचलम, कर्नाटकातील हम्पी अाणि तामिळनाडूतील रामेश्वरम या तीर्थक्षेत्रांचा या याेजनेत समावेश अाहे.
 
रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीचा धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने बुस्ट मिळणार आहे. नाशिक शहरातील रामकुंड, टाकेद, पंचवटी यासह इगतपुरी तालुक्यातील कावनई तीर्थक्षेत्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने पायाभूत सुविधांनी नाशिकला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. या योजनेचा १००% निधी केंद्रशासनाकडून मिळणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री अध्यक्ष असलेल्या सुकाणू समितीकडे नाशिक व नागपूरचा सविस्तर प्रकल्प अहवाल पाठवावा लागणार असून समितीच्या मंजुरीनंतर योजनेचा निधी वितरीत केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत रामायण सर्किट व कृष्ण सर्किटचा विकास करण्यात येणार आहे. केंद्रीय मार्यातन मंत्रालयाची एकूण ४०० कोटींची ही योजना आहे.

वेबदुनिया वर वाचा