मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडात नुसरतपूर गावात जयभीम शिरसाठ हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. शिरसाठ हे मिस्त्रींचे काम करत असून त्यांनी सहा महिन्यापूर्वी त्यांचे पत्राचे घर बांधले होते. नेहमी प्रमाणे ते दुपारी कामावर गेले. त्यांची दोन्ही मुले देखील शाळेत गेली. त्यांची पत्नी घरात एकटीच होती. घरात त्या गॅसवर स्वयंपाक करत होती. त्यांना त्यांच्या घराच्या जवळ राहणाऱ्या मावशीचा फोन आल्यावर त्या स्वयंपाक सोडून जवळच्या मावशीच्या घरी गेल्या आणि काही क्षणातच गॅसचा भडका उडाला. घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले मात्र सुदैवाने त्या अपघातातून थोडक्यात बचावल्या. अग्निशमन दलाने तातडीने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले.