नागपुरातील 50 तरुण इंग्लंडधून बेपत्ता

सोमवार, 22 जानेवारी 2018 (14:49 IST)
बनावट पासपोर्ट व व्हिसा तयार करून इंग्लंडमध्ये गेलेले नागपुरातील 50 हून अधिक तरुण अचानक बेपत्ता झाले आहेत. या संदर्भात ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयाने नागपूर पोलिसांना कळवले असून आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे सर्व तरुण मुस्लीम असून त्यांना पाठवणारी दाम्पत्यसुद्धा मुस्लीम आहेत. त्यामुळे या बेपत्ता तरुणांचा वापर मानवी तस्करी किंवा दहशतवादी संघटनांमध्ये काम करण्यासाठी झाला असण्याची शंका घेतली जात आहे.
 
गेल्या दोन ते तीन वर्षांत व्यवसाय व उद्योग करण्याच्या निमित्ताने नागपूरहून अनेक तरुण इंग्लंडमध्ये गेले. मात्र तेथून ते परतले नाहीत. त्यांच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांचा शोध घेतला असता ते तेथे सापडले नाहीत. त्या सर्व मुलांचे पासपोर्ट नागपुरातील पारपत्र कार्यालयातून तयार करण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबर 2017 मध्ये मुंबईतील ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयाने नागपूर पोलीस आयु्रतांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करा, अशी विनंती केली. त्यानुसार पोलीस आयु्क्तांनी प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयु्क्त सोनाथ वाघचौरे यांच्याकडे सोपवला. त्यांनी आयु्क्तांना अहवाल सादर केला आहे.
 
आठ दाम्पत्यांचा उद्योग
 
या शहरातील आठ दाम्पत्यांनी त्यांचीच मुले असल्याचे भासवून व बनावट दस्तऐवज तयार करून काही तरुणांचे बनावट पासपोर्ट व व्हिसा तयार केले. त्यानंतर या तरुणांना इंग्लंडला पाठवण्यात आले. पण ते भारतात परतलेच नाहीत. या तरुणांच्या जन्मतारखांची तपासणी केली असता त्यांना इंग्लंडध्ये पाठवणार्‍या दाम्पत्यांना केवळ तीन महिन्यांच्या अंतराने मुले झाल्याचे दिसून आले आहे. शिवाय काही दाम्पत्यांना प्रत्यक्षात एक किंवा दोन मुले असताना त्यांनी 19 तरुण त्यांची मुले असल्याचे दाखवले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून संबंधित दाम्पत्यांची कसून चौकशी केल्यास सर्व प्रकार उघड होईल, अशी शिफारस वाघचौरे यांनी त्यांच्या तपास अहवालात केली आहे. व्हिसाची मुदत संपल्यानंतरही हे तरुण नमके कुठे गेले, याचा ठावठिकाणा इंग्लंड प्रशासनाला अजूनही कळला नाही. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती