राज्यातील आणि देशातील सर्वात मोठी अशी असलेली मनपा अर्थात मुंबई महापालिकेत आता नवीन महापौर विराजमान होणार आहेत. विशेष म्हणजे मुंबई महापालिका महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले. तर 95 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच महापौर होणार, हे चित्र स्पष्ट आहे. मात्र आता विधानसभा निवडणुकीनंतर ज्यांना तिकीट मिळाले नाही किंवा ज्यांना थांबायला सांगितले होते असे शिवसेनेत महापौरपदाचे अनेक दावेदार आहेत. सध्या विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गच्छंती होणार हे तर निश्चितच झाले आहे.
आता महापौरपदासाठी मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर यांची नावं सर्वात पुढे असून, तर जुन्या फळीतील राजुल पटेल यांना अद्याप कोणतीही मोठ्या पदाची संधी मिळालेली नसल्याने त्यांचंही नाव चर्चेत आले आहे मात्र त्यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेली बंडखोरी केली होती त्यामुळे त्यांना पक्ष संधी देईल कि नाही असे चित्र आहे. तर दुसरीकडे माजी महापौर आणि विद्यमान सभागृह नेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, शितल म्हात्रे, बाळा नर, रमाकांत रहाटे, सुजाता पाटेकर यांचीही नावे पुढे आली आहेत. राज्यातील 27 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली चिठ्ठ्या टाकून काढली गेली आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह इतर महापालिकांचे महापौर, उपमहापौर तसेच पदाधिकारी, नगरविकास विभागाचे सहसचिव, अप्पर सचिव, कक्ष अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.